कोरोना आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देवू शकणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे. 

यामुळे येथील चाचण्यांचा वेग वाढणार असून ज्यांना आजाराची लक्षणे असतील, बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील असतील अथवा इतर गंभीर आजारांनी त्रस्त असतील अशा व्यक्ती त्यांचे घशातील स्त्राव जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी देऊ शकणार आहेत. अशा व्यक्तींनी त्यांचे स्त्राव तपासणी येथे करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने ‘चेस द व्हायरस’ हे लक्ष्य ठेऊन रुग्णांपर्यंत पोहोचण्याची मोहीम आखली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.

त्याचमुळे आता ज्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत तसेच जे बाधीत रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत, अशा व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा व्यक्ती आता जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची स्त्राव तपासणी करून घेऊ शकणार आहेत.

ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी वेळीच स्त्राव तपासणी करून घेतली तर त्यांना वेळीच उपचार देणे शक्य होणार आहे.

ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी  जिल्हा रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. घरातील वृद्ध आणि बालके यांचा सार्वजनिक ठिकाणचा संपर्क टाळणे आवश्यक आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये. संसर्गाची ही साखळी तोडायची असेल तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर मास्क घालून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी  यांनी केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24