आता एवढ्या भक्तांना मिळणार विठुरायाचे दर्शन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यभरात गेले अनेक महिने धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अखेरीस महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेत व भाविकांची श्रद्धा लक्षात घेत धार्मिक स्थळे खुली करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार कालपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोन हजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घालून दिलेल्या नियम व अटींची अंमलबजावणी करतच दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे राज्य शासनाने उघडण्यास परवानगी दिली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज एक हजार भाविकांना दर्शनाकरिता सोडण्यात येत होते,

आता दर्शनाकरिता दोन हजार भाविकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मात्र नित्योपचार दैनंदिन सुरु राहिले. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खूली करण्यात आली आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी गाभारा, विठ्ठल सभामंड, रुक्मिणी सभामंडप, नामदेव पायरी, दर्शन रांग आदींची कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. मंदिरात व नामदेव पायरी ते दर्शन रांगेत स्वच्छतेबरोबरच सॅनिटायझर फवारण्यात येत आहे.

दर्शन रांगेत दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाईल, याची खबरदारी घेण्यात येत आहे, त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या भाविकांकरीता सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाच्या निर्देशानुसार मंदिरात दर्शनाकरीता येणाऱ्या भाविक, भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24