महाराष्ट्र

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 1170 रुपयात फिरता येईल संपूर्ण महाराष्ट्र! एसटीने आणली स्पेशल पासची सुविधा

Published by
Ajay Patil

सध्या मुलांच्या परीक्षा संपल्या असून शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बरेच व्यक्ती कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लान बनवतात. तसेच गावाकडे जाणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर या कालावधीत वाढते.

याकरिता प्रवाशांची गर्दी आटोक्यात आणता यावी म्हणून रेल्वे विभागाकडून देखील अतिरिक्त रेल्वे गाड्या बऱ्याच मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या आहेत व त्यासोबतच एसटी महामंडळाकडून देखील अनेक मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आलेले आहेत. त्यासोबत हा सुट्ट्यांचा कालावधी म्हणजे पर्यटनाचा कालावधी समजला जातो व अनेक व्यक्ती अनेक ठिकाणी पर्यटनासाठी या कालावधीत जातात.

या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमचा देखील असाच कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तुमच्या सेवेशी आता हजर झाले असून एस टी महामंडळाने तुम्हाला एक स्पेशल पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करू शकणार आहात.

 एसटी महामंडळाने आणली आवडेल तेथे कुठेही प्रवास योजना

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून “आवडेल तेथे कोठेही प्रवास” योजना आणली असून या अंतर्गत आता प्रवाशांना संपूर्ण राज्यभर अतिशय कमी खर्चामध्ये फिरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसे पाहायला गेले तर ही योजना 1988 पासून प्रवाशांसाठी राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून एसटी महामंडळ तुम्हाला सात दिवस आणि चार दिवसाच्या कालावधीसाठी पास देते. या अंतर्गत तुम्हाला साध्या बसेस आणि शिवशाही बसेस अशा दोन्ही प्रकारच्या बसमधून प्रवास करण्याची संधी मिळते. परंतु याचे दर मात्र वेगवेगळे असतात.

 किती आहेत दर?

एसटी महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून मुलांसाठी आणि प्रौढांकरिता पासच्या किमती वेगवेगळ्या ठेवण्यात आलेल्या असून तुम्ही चार दिवसांची पास घेतली तर प्रौढ व्यक्तींकरिता 1170 रुपये मोजावे लागतील तर लहान मुलांकरिता 525 रुपये द्यावे लागतील. तुम्हाला प्रवास जर शिवशाही बसच्या माध्यमातून करायचा असेल तर याकरिता प्रौढांसाठी पंधराशे वीस तर लहान मुलांकरिता 765 रुपये लागणार आहेत.

याव्यतिरिक्त तुम्ही सात दिवसांची पास घेतली तर प्रौढ व्यक्तींना 2040 तर लहान मुलांना 1025 रुपये पास करता द्यावे लागतील. सात दिवसांकरता जर तुम्ही शिवशाही बसची निवड केली तर त्याकरिता प्रौढ व्यक्तींना तीन हजार तीस रुपये आणि मुलांकरिता पंधराशे वीस रुपये पास करिता द्यावे लागतील.

यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की ज्या मुलांचे वय पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षांपेक्षा कमी आहे अशा मुलांसाठी हे पासचे दर आहेत. बारा वर्षाच्या पुढील जर मुलं असतील तर त्यांना पूर्ण पासचा दर द्यावा लागेल.

 कुठे मिळेल तुम्हाला ही पास?

तुम्हाला जर ही पास हवी असेल तर तुम्ही एसटी आगार येथील काउंटरला भेट देऊ शकता आणि ऑफलाइन फॉर्म पूर्ण करू शकतात. या पास करिता तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे गरजेचे आहे. प्रवाशांनी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जर तुमचा घेतलेला पास हरवला तर डुबलीकेट पास मिळत नाही व जी पास हरवली त्यापासून कुठल्याही प्रकारचा रिफंड मिळत नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil