महाराष्ट्र

अरे बापरे! पुण्यातील पोलिसाचा नगरला आत्मदहनाचा प्रयत्न, काय होते आत्मदहन करण्याचे कारण…. वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.

स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय ३५, राहणार पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. नगर) हे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे.

त्यांच्याविरूद्ध सुपे पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. २०१८ मध्ये खुनाचा प्रयत्न आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा त्यांच्या पत्नीने दाखल केला होता.

त्यांनतर पती-पत्नीचे पटत नसल्याने त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यातच मांडगे यांच्याविरोधात ७ जानेवारी २०२२ रोजी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा खोटा आरोप असून स्थानिक पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळलो असल्याचे

सांगून मांडगे सायंकाळी रॉकेलचा डबा घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यानंतर एका अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी तात्काळ अटकाव केला. त्यावर मांडगे यांनी आरडाओरड सुरू केली होती. या संदर्भात उपअधीक्षकअनिल कातकाडे यांनी मांडगे यांची समजूत काढून त्यांना भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office