MLA Prajakat Tanpure : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. प्राजक्त तनपुरे अधिवेशनात आक्रमक ! म्हणाले या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MLA Prajakat Tanpure : विधानसभेच्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे अनेक प्रश्न लक्षवेधी मांडून सरकारला धारेवर धरत आहेत.मंगळवारी देखील आमदार तनपुरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले.

मंगळवारी आ. तनपुरे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. आ. तनपुरे म्हणाले, गेल्या वर्षभरापासून असलेल्या राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबली आहेत. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी सर्वांनाच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी,

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली कामे आता अत्यंत धीम्यागतीने सुरू आहेत. ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर तो त्वरित मिळावा या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र वस्तूस्थिती पाहता या योजनेवर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे हा प्रश्न आहे.

ऊर्जा खात्याअंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी एसीएफ फंड महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपलब्ध करून देण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सुमारे २ हजार कोटी रुपयांचा हा फंड अचानक बंद करण्यात आला.

शेतकऱ्यांचे २ लाखांवरील कर्ज माफ करण्याची घोषणा, प्रधानमंत्री किसान योजना सपशेल फोल ठरल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील वेगवेगळी निकष लावून अत्यल्प दुधाचे दर मिळत आहेत. सर्वच बाबींवर सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची आम्हाला मंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे, असेही आ. तनपुरे विधानसभेच्या चर्चेत म्हणाले.