महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका आतून एक व बाहेरून एक !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका आतून एक व बाहेरून एक, अशा प्रकारची असून, कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय न घेता केवळ वेळकाढूपणा करत सरकारने खोटेपणाचा मुखवटा धारण करून मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे काम चालवले आहे.

आरक्षणप्रश्नी सरकारने आता जनतेचा अंत पाहू नये, असे आवाहन मा. जि. प. उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी केले आहे.याबाबत माहिती देताना ते पुढे म्हणाले की, आरक्षण प्रश्नाबाबत शासनाने वेळकाढूपणाचे धोरण बाजूला ठेवत राज्यातील मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

आरक्षण प्रश्नाबाबत सकल मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चे, आंदोलने केली. मराठा समाजाच्या सहनशिलतेलाही मर्यादा आहेत. सरकारी नोकरी किंवा शिक्षणव्यवस्थेमध्ये मराठा समाजाचा तरुण आजही उपेक्षित आहेत.

असे असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी काहीतरी गाजर किंवा आमिष दाखवून मराठा समाजाचा वापर करून घेत समाजाला झुलत ठेवण्याचे काम शासनाने आतापर्यंत केले आहे.

शासनाने आता मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर तातडीने निर्णय घेत सरकारने समाजाला दिलासा द्यावा अन्यथा लोकांच्या तीव्र भावनांचा उद्रेक सरकारला सहन करावा लागेल.

इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यावे, अशी सकल मराठा समाजाची भावना आहे.

आरक्षण प्रश्नावर अभ्यास करू, समिती नेमण्यात येईल, कायदेशीर लढाई लढू, अशी खोटी आश्वासने देऊन राज्यातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम सरकार करत आहे.

सदर प्रश्नावर राजकीय नेत्यांनी व्यापक लढा उभारण्याची भूमिका घेण्याची गरज आहे. शासनाने आरक्षण प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे

किंवा राज्यातील सर्वच समाजाला आरक्षण द्यावे किंवा सर्वच समाजाचे आरक्षण काढून घ्यावे. मराठा आरक्षणावर चालू असलेल्या आंदोलनास सुजित झावरे यांनी पारनेर- नगर तालुक्यातील जनतेच्या वतीने पाठिंबा देऊन वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office