Kanda Anudan : १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर कांद्याचे अनुदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Anudan : दरातील घसरण व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाने घेतला होता.

त्यानुसार हे अनुदान १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधान परिषद सभागृहात दिली. राज्यातील कांदा उत्पादकांना अनुदान देण्यासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी तारांकित प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक तसेच नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधी लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यातील ३ लाख कांदा उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरले असून त्यांना अनुदान देण्यासाठी या अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ५५० कोटी रुपयांची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. ही मागणी मंजूर झाल्यानंतर १५ ऑगस्टपूर्वी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील,

असे सत्तार यांनी सांगितले. तसेच ३१ मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा होता, मात्र त्यांनी ई-पीकपेऱ्याची नोंद केलेली नाही किंवा मार्केट कमिटीमध्ये नोंद केलेली नाही त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही २०० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात येईल,

तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असेही सत्तार यांनी सभागृहाला आश्वस्त केले. या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील, नरेंद्र दराडे, शशिकांत शिंदे, भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.