Kanda Anudan : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर करण्यात येऊन शेतकऱ्यांना देण्यात येणारे कांद्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल,
अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना गुरुवारी दिली. नगर दक्षिण मतदारसंघात मोठया प्रमाणावर जिरायती शेती असून, अनेक शेतकऱ्यांचे कांदा हेच पीक आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आ. नीलेश लंके यांचा पाठपुरावा सुरू आहे.
कांद्याचे दर कोसळल्याने आ. नीलेश लंके यांच्यासह राज्यातील अनेक आमदारांनी आंदोलन करून कांद्याला हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या कांद्याला प्रति विटल साडेतिनशे रुपयांचे अनुदान जाहीर केले होते.
त्यासाठी पीकपाहणी, बाजार समितीच्या विक्रीपट्टया तसेच बँक खात्याचा तपशील बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी सादर केला होता. चार महिने उलटूनही हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
आ. लंके यांनी अजितदादा पवार यांची गुरूवारी मंत्रालयात भेट घेऊन हे अनुदान तातडीने वर्ग करण्याची मागणी केली. त्यावर सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले की, तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वर्ग होईल, अशी ग्वाही पवार यांनी या वेळी दिली.
आ. लंके यांनी अजितदादा पवार यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, तालुक्यातील ५ हजार ३७३ लाभार्थ्यांचे सुमारे ११ कोटी ५७ लाख ४६० रूपये इतके अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. जिल्ह्यात ४७ हजार ७६२ लाभार्थी शेतकरी असून त्यांचे एकूण १०३ कोटींचे अनुदान प्रतिक्षेत असल्याचे आ. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नगर दक्षिणला प्राधान्य द्या
नगर जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून, विशेषत: जिल्ह्याच्या दक्षिण भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी दक्षिण भागातील शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरात लवकर प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. असे आ. लंके यांनी ना. पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.