‘या’ दुर्दैवी निर्णयावर पवार साहेबच मार्ग शोधतील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हि निर्यातबंदी उठवावी यासाठी राजकीय नेतेमंडळी देखील सक्रिय झाले आहे.

या निर्यातबंदीवरून नगर जिल्ह्यात देखील संतापाची लाट उसळली आहे. मात्र केंद्र शासनाने अचानकपणे घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी असून यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निश्चितपणे मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यामुळे कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरणे साहजिक आहे. कोरोनामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून पर्यायाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याला कांद्यातून थोडाफार आधार मिळणार होता. मात्र कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ते स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांना महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिलासा देत आहे.

तसेच जागतिक कोरोनाच्या संकटात देखील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. आज शेतकर्‍यांना केंद्र शासनाकडून मदतीची गरज असताना केंद्र शासनाने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय हा अतिशय दुर्दैवी आहे.

तरीही याबाबतीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याबाबत निश्चीतपणे मार्ग काढतील असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24