शिर्डीचं साई मंदिर उघडा; आता शिवसेना खासदाराचीच मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे.

परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. परंतु आता शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतःच याला आग्रही झाले आहेत.

‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून शिर्डी येथील साईबाबा मंदिर सुरू करावे,’ अशी मागणी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. ‘कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, ही दक्षता घेण्यासाठी सरकारने मंदिर बंद केले होते.

मंदिर बंद करण्याचा तसा काही विषय नव्हता. तेथे केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, म्हणून ती बंद केली होती. आता टप्प्याटप्याने मंदिरे सुद्धा सुरू होतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्याने अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

त्यातच आज शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीचे मंदिर उघडण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, साईबाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी द्वारकामाईतून पालखी काढण्यात येत आहे. मात्र मार्च महिन्यापासून सदरचा पालखी सोहळा बंद करण्यात आला आहे.

राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर शेगाव आदी ठिकाणच्या देवस्थानांप्रमाणे शिर्डीतील साईबाबांची दर गुरूवारची पालखी संस्थानमार्फत

कमीत कमी पुजारी तसेच पालखीसाठी लागणारे कर्मचारी यांंच्यासह भक्तांसाठी लाईव्ह दर्शन व्यवस्था सुरू करावी यासाठी आम्ही शिर्डी ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करू अशी मागणी माजी नगराध्यक्ष कोते यांनी केली होती.

आ. विखेही याबाबत आग्रही होते. आता स्वपक्षीय खासदारानेच ही मागणी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24