पवार घराण्याला विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राम शिंदे मंत्री असताना जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होते. आता पक्षाचे तीन आमदार आहेत, परंतु राज्यातील सत्ता जाताच जिल्ह्यातील भाजप दिसेनाशी झाली आहे.

जिल्ह्यात भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी व पवार घराण्याला प्रबळ विरोधासाठी राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची जुळवाजुळव सुरू आहे.

शिंदे यांच्यासह शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवा मागील सूत्रधार भाजप नेते विखे पिता-पुत्र असल्याचा आरोप करण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीपर्यंतच त्यांचा पवार घराण्याला विरोध होता. त्यानंतर त्यांचा विरोध मावळला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी राम शिंदे यांची प्रतिमा आहे.

फडणवीस यांनी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली होती. लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्षाने त्यांना स्टार प्रचारक नियुक्त केले होते.

शिंदे सलग साडेचार वर्षे जिल्ह्यातील एकमेव मंत्री होते व पालकमंत्री होते. राज्यात सत्ता असल्यामुळे आमदार रोहित पवार यांचा जिल्ह्यात वरचष्मा आहे. मिनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात त्यांचा वावर असतो.

त्यांच्या शब्दाला पवार घराण्याचे वारस म्हणून किंमत आहे. हे सर्व पाहता भविष्यात ते जिल्ह्य़ाच्या राजकारणात सक्रिय राहून आपले वर्चस्व सिद्ध करणार आहेतच व त्यांना विरोधक राहणार नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24