अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह चार जणांना निलंबित तर दोघांची सेवा समाप्त करण्याचा आदेश दिला.
या कारवाईमध्ये तीन परिचरिकांचा समावेश असल्याने सरकारने केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत आज मंगळवारी सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिदक्षता विभाग किंवा इतर कोणत्याही विभागाची सुरक्षा, तांत्रिक यंत्रणा याची जबाबदारी वरिष्ठांची असते. तसेच संबधित विभागांची असते.
अचानक आग लागल्यानंतर त्याला जबाबदार धरून परिचरिकांना निलंबित करणे, सेवा समाप्ती करणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. त्यामुळे ही कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा राज्यभरातील परिचारिका संवर्गातील कर्मचारी आवाज उठवतील.
यापुढे अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यास नकार दिला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या निषेध सभेनंतर सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही कार्यरत असणार आहोत.
मात्र, अन्यायकारक पद्धतीने झालेल्या निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. करोनाच्या काळामध्ये शासकीय परिचारिकांनी अहोरात्र काम केले.
अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. नातेवाईकांना सोबत थांबण्यास मज्जाव असताना आपल्या जीवावर उदार होऊन परिचारिकांनी काम केलेले आहे.