अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. जहीरचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरु केले. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस येवून सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज हा विक्रम ही त्याने केला आहे.
रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. या डावखुऱ्या गोलंदाजाने अल्पावधीतच छाप पाडली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना त्याने अप्रतिम यॉर्करवर महान फलंदाज स्टीव्ह वॉ याचा त्रिफळा उडवला, तेव्हापासून तो प्रकाश झोतात आला. भारतीय क्रिकेट संघाचा तो मुख्य गोलंदाज झाला. त्याने अनेक सामने एकहाती जिंकून दिले. यॉर्कर हे त्याच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र होते.
झहीर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झेडकेज नावाने हॉटेल सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. झहीरच्या श्रीरामपुरातील आठवणी या पद्मश्रीमुळे जाग्या झाल्या. भारतीय संघात त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा क्रिकेट संघटनेने त्याचा मोठा सन्मान सोहळा केला होता.