अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे मंत्री असताना अनेक नेत्यांनी त्यांना बहीण मानले होते. अधूनमधून होणाऱ्या सभा-समारंभातून बहीण-भावाच्या प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात होत्या.
मधल्या काळात राजकीय वातावरण बदलले. निवडणुकीतील पराभवानंतर मुंडे एकाकी पडल्या होत्या. मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना ‘नवा भाऊ’ भेटला आहे. या भावाने शब्दरूपी ओवाळणी घातली आहे. भावाचे हे पत्र त्यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.
विलास बडे या कार्यकर्त्याने राक्षाबंधनानिमित्त पंकजा मुंडे यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. ‘एका भावाचे सुंदर पत्र’ असे म्हणत पंकजा मुंडे यांनी ते शेअर केले आहे. ‘कोळशावर फुंकर मारली तर राख उडून तेजस्वी निखारा पुन्हा पेट घेतो. तसं काही लोक काही वेळा शब्दांची व भावनांची फुंकर मारून निखारा फुलवतात तसंच काम या शब्दांनी केले आहे.
बहिणीला एका भावाची ही ओवाळणी आहे,’ असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. बडे यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘आजचा दिवस आनंदाचा आहे. अशावेळी हे लिहावं की नाही यावर बराच विचार केला, पण राहावलं नाही म्हणून लिहितोय. तुम्ही कधी बोलला नाहीत. शांत आहात पण तुमच्या मनातलं वादळ स्पष्ट जाणवतंय.
कारण ते आमच्याही मनात धडका देतंय. व्यक्त होता येत नाहीय इतकंच. ताई, काळ कसोटीचा आहे. मानसिक परीक्षेचा जरूर आहे. पण यातली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की आपलं यापेक्षा आणखी काही वाईट करण्याची त्या देवाचीही ऐपत नाही. त्यानं सगळ्या परीक्षा घेऊन पाहिल्या. अनेक घाव घातले.
कदाचित त्यालाही वाटलं असेल, बघावं तुम्ही तुटताय का. पण होतंय अगदी उलट. तुटणं सोडा, तुम्हाला पैलू पडताहेत. मला विश्वास आहे. हेच जग उद्या म्हणणार आहे, अरे हा तर हिरा निघाला. ताई, सच्चेपणा हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं सौदर्य आणि सामर्थ्य आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून ते बघतोय.
तुमचं वागणं, बोलणं, व्यक्त होणं, काम करणं आणि लढणं यातला सच्चेपणा मला कायम भावला. या सच्चेपणाचा तुम्हाला त्रास झाला. तरी तुम्ही तो कधी सोडला नाही. कारण त्यावर तुमची अढळ श्रद्धा आहे, नव्हे तीच तुमची ओरिजिनॅलिटी आहे. असं म्हणतात वाईट काळात माणसं कळतात.
भल्याभल्या नेत्यांच्या भोवतीची गर्दी एका वावटळीनं उडून जाते. पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही. भलेही सत्ता गेली असेल. पद नसेल. भविष्यही दिसत नसेल. वान्याची भीतीही वाटत असेल पण तरीही तुमच्याकडे आशेनं पाहणाऱ्या लाखो लोकांच्या प्रेमाची, विश्वासाची तटबंदी तुमच्याभोवती कायम आहे.
माझ्यासारखे असंख्य तरुण आजही तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहेत. त्यामुळे तात्कालिक वावटळी धुरळा जरूर उडवू शकतात, पण तुमचा हौसला तोडू शकत नाहीत हा मला विश्वास आहे.’ भगवान गडावर झालेल्या एका कार्यक्रमात सर्व भाऊ एकत्र आले होते.
तसे हे सर्व भाऊ दुरावले. मधल्या काळात मुंडे एकाकी पडल्याचे वातावरण आहे. नगरच्या आणखी एका लोकप्रतिनिधीने मुंडे यांना बहीण मानले होते. आता आणखी एका नव्या पण राजकारणात नसलेल्या भावाच्या पत्राने फुंकर घातली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com