BIg Breaking : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश गुसिंगे याचा पिंपरी-चिंचवड पोलीस भरती व म्हाडा पेपरफुटीत सहभाग असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले आहे.
संशयित गणेश गुसिंगे याचे नातेवाईक पोलीस, महसूल व वनविभागात कार्यरत असल्याबाबत माहिती उघड झाली असून, तलाठी भरती पेपरफुटीत मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
म्हसरूळ येथील वेब इन्फोटेक सोल्यूशन या केंद्रावर तलाठी पेपर फुटीप्रकरणी गणेश शाससिंग गुसिंगे (२८, रा. संजारपूरवाडी, परसोडा, ता. वैजापूर), सचिन नायमाने, संगीता रामसिंग गुसिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा एक अट्टल पेपरफोड्या आहे. म्हाडा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
संशयिताविरोधात म्हाडा परीक्षा भरतीत गैरप्रकारप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस भरती २०१९ मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला होता. गुसिंगे फरार असताना त्यास अटक करण्यास एवढे दिवस कसे लागले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
संशयिताला सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान परीक्षा केंद्राबाहेरून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी लागलीच परीक्षा केंद्राबाहेर बंदोबस्त लावला असता आणि पेपर झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या परीक्षार्थीची चौकशी केली असती, तर दुसरी संशयित परीक्षार्थीदेखील पोलिसांच्या ताब्यात आली असती, अशी चर्चा होत आहे.
तलाठी भरती परीक्षेच्या हायटेक कॉपी प्रकरणात संशयित आरोपीसोबत अजून दोन नावे पुढे आली आहेत. त्यात संशयिताची बहीणच परीक्षेसाठी उमेदवार होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून संशयिताची बहीण आणि साथीदार पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस पथक अजूनही त्यांच्या शोधार्थ छत्रपती संभाजीनगर येथे तळ ठोकून आहे, अशी माहिती म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली आहे.