Maharashtra Politics : राजकीय पक्षावर दरोडा घालण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरू असून, सरकारी यंत्रणा ही सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे.
राज्यात दोन मराठी माणसांनी उभारलेले पक्ष फोडण्यात आले, असे म्हणत आगामी काळात याविरुद्ध महाराष्ट्राला सक्षमपणे उभारण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हास पार पाडायची आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे पक्ष चिन्ह व पक्षाबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर होत असलेल्या या पहिल्याच सभेला कार्यकत्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
या मेळाव्यात सर्वांच्या वक्तव्याकडे लक्ष लागले होते. कर्जत येथे आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कर्जत येथे राष्ट्रवादी विजय निश्चय मेळाव्याचे आयोजन केले होते, मात्र त्याच्या अगोदरच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतल्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व युवकचे मेहबूब शेख यांनी मनोगते व्यक्त केली तर आ. रोहित पवार यांनी बोलताना, भाजपावर जोरदार टीका केली. कालचा निर्णय असंविधानिक आहे.
मागील अनेक दिवसांपासून देशाचे संविधान बाजूला ठेवण्याचा प्रताप भाजपाकडून होत आहे. २०२४ ला भाजपाची सत्ता आल्यास स्वतःला योग्य वाटेल, असे संविधान निर्माण करून लोकशाही राहील का नाही?
असा बदल घडवतील याची भीती वाटते, असे म्हणत आजपर्यंतचा इतिहास आहे. जे भाजपाबरोबर गले ते लोकनेते राहिले नाहीत. त्यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचे षडयंत्र भाजपा करीत आहे.
लोकसभेला जागा पाहून त्यांच्या बरोबर राहतील की नाही, याची भीती भाजपासोबत गेलेल्यांना सतावत आहे. निवडणूक आयोगाचा निकाल अपेक्षित होता. त्यास कोणीही घाबरून जाऊ नये.
आपल्याला पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे. मी जर उद्या तुरुंगात गेलो तर माझे कुटुंब या मतदारसंघात लोकहिताचे काम व साहेबांचा विचार पुढे घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला,
जखमी वाघ असणाऱ्या पवार साहेबांचा झंझावात आगामी काळात या फोडाफोडीच्या महायुतीला धडा नक्की शिकवेल, अशी गर्जना करत विचार आणि एकीची ताकद एकत्र असेल तर ह्या शासकीय यंत्रणेला धडा सर्वसामान्य जनताच शिकवेल, असा विश्वास ही व्यक्त केला.