महाराष्ट्र

राऊतांनंतर पवारांचे निकटवर्तीय टार्गेट? कराडमध्ये ईडीचा छापा

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News:शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर इडीने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडे वळविल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या कराड जनता बॅंकेवर आज सकाळी ईडीने छापा घातला आहे.बेकायदा कर्जवाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येते. कराडमधील राजेंद्र पाटील यांनी या बॅंकेत शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती.

सध्या जनता बॅंकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे, बहुतांश संचालक हे राष्ट्रवादीचे तसेच पवारांचे समर्थक आणि निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच राऊतांनंतर आता पवारांच्या निकटवर्तीयांना टार्गेट केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पाटल यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आस्तित्वात नसलेल्या लोकांना बँकेने कर्जवाटप केले. गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही नियमांचे पालन न करता जनता बॅंकेने कर्ज दिले. अशा तक्रारींवरून ही चौकशी सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office