Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेतर्फे शुक्रवार, १७ मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून १४ मिनिटांची कसारा लोकल शेवटची असणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ वर २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या उभ्या करण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे.
आता अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, १७ मे ते शनिवार, १ जूनदरम्यान दररोज रात्री सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा अप धीमा, अप-डाऊन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १०-१८ दरम्यान सर्व मार्गिकेवर असणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही मेल-एक्स्प्रेस पनवेल, दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
कसाऱ्यासाठी मध्यरात्री १२.१४ ची शेवटची लोकल
१७ ते २० मेदरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस आणि मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम होणार आहे. यामध्ये सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ वाजताची कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कल्याणहून रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. सीएसएमटीहून पहाटे ४.४७ वाजता कर्जत ही पहिली लोकल असणार आहे. ठाण्याहून पहाटे ४ वाजताची सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे. ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.
दादर स्थानकात अंशतः रद्द करण्यात येणाऱ्या गाड्या
ट्रेन क्रमांक १२५३३ लखनौ सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी, ट्रेन क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन- सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १११४० होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक २२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहे.
दादरहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस
ट्रेन क्रमांक २२१५७ सीएसएमटी- चेन्नई सुपरफास्ट मेल, ट्रेन क्रमांक ११०५७ सीएसएमटी- अमृतसर एक्स्प्रेस, २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, आणि ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला दादरहून सुटणार आहे.