Maharashtra News : गोकुळअष्टमीच्या सणानिमित्त पुणे शहर व लगतच्या परिसरात आज गुरुवारी (दि. ७) दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरात नागरिकांची गर्दी उसळते. विशेषतः बूधवार चौक ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक,
बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई चौक, हुतात्मा बाबू गेनू चौक, साहित्य परिषद चौक, नवी पेठ या परिसरात गर्दी उसळते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पुढीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्यांनी जंगली महाराज मंदिराजवळील स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे टिळक रस्त्याने वा लालबहाद्दूर रस्त्याने इच्छित स्थळी जावे.
पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगर जाणाऱ्या वाहनचालकांनी या टिळक रस्त्याने टिळक चौकातून पुढे फर्ग्यूसन रस्ता मार्गे इच्छित स्थळी जावे. पूरम चौकातून सेनादत्त चौकमार्गेही पुढे जाता येईल.
स. गो. बर्वे चौकातून बुधवार चौकमार्गे अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सोडण्यात येईल. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्याने पुढे इच्छितस्थळी जात येईल.
महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण विभागाने केले आहे. पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी त्याबाबतचे पत्र जारी केले आहे.