अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. नुकतेच 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इच्छुकांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.
आता सर्वांच्या नजर निकालाकडे खिळल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या (सोमवार) होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करण्यास तसेच मतमोजणी झाल्यानंतर विजयी मिरवणूका काढण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.
मुंबई पोलीस अधिनियमानुसारही स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत असून, अशा वेळी नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्याकरिता नागरिकांनी एकत्रित जमावाने येण्याचे टाळणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करू नये, तसेच विजयी मिरवणुका काढण्यात येऊ नये.
नागरिकांनी आपल्या घरी बसून प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूक निकालाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.