मला राज्यातून तडिपार करण्याचा डाव ! मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारविरुद्ध संताप

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मी मॅनेज होत नाही, असे समजल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डाव टाकून माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी चौकशी लावून मला राज्यातून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे.

परंतु, मी अजिबात घाबरणार नाही. करून करून काय करणार, तुरुंगात टाकणार असतील, तरीही मी भीत नाही. मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्यांना सोडणार नाही. तुरुंगात राहूनही मराठ्यांचा दहा पट मोठा मोर्चा काढणार,

असा इशारा देत मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आक्रमक होत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

उदगीर येथील रघुकूल मंगल कार्यालयात बुधवारी (दि. १०) मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची संवाद बैठक झाली. यावेळी उदगीर शहर व तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले, मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न असून, जो कोणी मराठा व मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल, त्याला सोडणार नाही. आगामी काळात मराठा आरक्षणासाठी झुंज द्यावी लागणार आहे.

माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्र रचले जात आहेत. विविध पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांमार्फत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझा समाज माझ्या संरक्षणासाठी सक्षम असून, पोलीस संरक्षणाची मला गरज नाही.

माझ्या जवळच्या लोकांना फोडून माझ्या विरोधात बोलण्यासाठी टीव्हीवर पाठवतात. परंतु, त्यांच्याकडे असलेले अनेक लोक त्यांचे ठरलेले डाव मला सांगतात. माझ्याविरुद्ध अनेक षडयंत्र रचून विविध पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

गोदापट्ट्यातील लोकांना पैसे वाटून फोडण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांना विकत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मराठा विकू शकत नाही, मराठा समाज अवघ्या दोन तासांत पाच करोड रुपये जमा करून देऊ शकतो, असे ते म्हणाले.

८ जूनच्या सभेसाठी गावागावांत बैठका घ्या

दिनांक ८ जून रोजी नारायणगड येथील ९०० एकरवर सहा कोटी मराठ्यांची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीसाठी गावागावांत-घराघरांत जाऊन प्रचार करा.

उद्यापासून विराट सभेचे स्टिकर्स प्रत्येक गाडीवर, सोशल माध्यमातून फिरवून जोरदार प्रचार करा. लोक विराट सभेच्या प्रचारात लोकसभा निवडणुकीचे चिन्ह विसरून गेले पाहिजेत.

नारायणगडच्या विराट सभेची तयारी करा. हे आरक्षण कसे देत नाहीत तेच बघतो, यांचा कार्यक्रमच करतो, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मुस्लिम, धनगर आरक्षणाचा प्रश्न हाती घेणार

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन लढा उभारणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मी ओबीसी बांधवांना कधीही दुखावले नाही. ओबीसींचे वरचे नेतेच मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून विरोध करतात. गावागावांतील ओबीसी समाज आमच्या सोबतच असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe