अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- राज्य सरकारने वाईन सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपने जोरदार मोहीम सुरू केली आहे.
नुकतेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून राज्य सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राजभवनातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारच्या वाईन विक्रीच्या नव्या धोरणाचा समाचार घेतला.
त्यांनी यावर कवितेच्या माध्यमातून निशाणा साधला. किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल… अशा कवितेच्या ओळी ऐकवत आठवले यांनी राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.
दारू आणि वाईन्स एकच आहेत. अजितदादांचं म्हणणं चुकीचं आहे. या निर्णया विरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा आठवले यांनी दिला.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या बाबत आठवले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त केलेली आमदारांची नावे राज्यपालांकडे द्यावीत. ही यादी लवकरात लवकर पाठवल्यास राज्यपालांना यावर निर्णय घेता येईल, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.