श्रीरामपूर :– तालुक्यातील टाकळीभानमध्ये पोलीस दलात सेवेत असलेले बापुराव कारभारी रणनवरे यांनी टाकळीभान येथील आपल्या राहत्या घरात नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
एक उत्कृष्ठ कब्बडी खेळाडू म्हणून 1994 साली पोलीस सेवेत बापुराव रणनवरे रुजू झाले होते. कब्बडी खेळातून पोलीस दलात सेवा करीत असताना व त्यापूर्वीही त्यांनी खेळाचे मैदान गाजविले होते.
रविवारी दुपारी येथील लक्ष्मीवाडी परिसरातील त्यांच्या रहात्या घरी कुटूंबातील कोणीही सदस्य नसल्याने दुपारी 3.30 च्या दरम्यान घराच्या एका खोलीत छताला दोर बांधून त्यांनी आत्महत्या केली.
काही वेळाने त्यांचा छोटा पुतण्या घराकडे आल्याने त्याने झालेला प्रकार पाहून आरडाओरड केल्याने शेजारी नागरिकांनी तिकडे धाव घेतली.
काही तरुणांनी मेजर रणनवरे यांचे लटकलेले शरीर खाली घेवून तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.
मेजर रणनवरे सध्या नेवासा ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पो.हे.कॉ. पदावर होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.