मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही – प्रा.राम शिंदे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत :- विरोधक म्हणतात, सूत गिरणीची चर्चा कुठेच झाली नाही. मग भूमिपूजन कसे? आपण सध्या चर्चा कमी करतो आणि काम करण्यावर जास्त भर देत आहोत. मतदारसंघात जे होत नव्हते, ते करून दाखवले, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.

वालवड येथे संत सद्गुरु गोदड महाराज सहकारी सूत गिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. गुगळेचे संचालक तथा उद्योजक दिलीप गुगळे, ज्ञानेश्वर माउली पठाडे महाराज उपस्थित होते.

मंत्री शिंदे म्हणाले, एक महिन्यात सर्व प्रक्रिया पार पाडत या सूत गिरणीला मंजुरी मिळवली. या सूत गिरणीद्वारे एका वर्षात १०० कोटींची उलाढाल होणार आहे. सूतगिरणी जरी गुगळे समूहाची असली, तरी कामगार कर्जत-जामखेड मतदारसंघातीलच असतील.

दीड हजार तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार असून आणखी हजार माणसांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळेल. ३६ वर्षांचे माळढोक आरक्षण हटवले. तुकाई चारी मार्गी लावली. कर्जत शहराच्या पाणीटंचाईवर मात केली. प्रथम टेलला पाणी देण्याचा निर्णय घेतला. ५० वर्षांत जे झाले नाही ते आपण पाच वर्षांत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

आपण मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. त्यामुळे लोक म्हणतात, आम्हाला तुमची कधीच भीती वाटत नाही. मी तुमच्यातलाच माणूस आहे. सत्तेत असताना विरोधी पक्षाचा कायम आदरच केला. कधी कुणाला कसलाही त्रास दिला नाही. त्यामुळे जनतासुद्धा आपल्याला त्रास देणार नाही, असा मंत्री राम शिंदे म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24