महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या महाजनादेश यात्रा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेला जे खोट सांगत आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाही.

त्यामुळे या महाजनादेश यात्रेचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही आजपासून काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला अमरावती येथून सुरुवात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. थोरात बोलत होते.

ते म्हणाले की, विधानसभेची निवडणूक जवळ आली असल्याने विविध पक्षांच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. मात्र आम्ही गेल्या पाच वर्षांपासून जनसंघर्ष यात्रा दोनदा संपूर्ण महाराष्ट्रातून काढली होती. आता आजपासून अमरावती येथून काँग्रेसची महापर्दाफाश ही यात्रा सुरू होत आहे. 

काँग्रेसचे नेते नानाभाऊ पटोले यांनी ही यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्ष यांची महाजनादेश, शिवसेनेची जनआशीर्वाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेपाठोपाठ आता काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा सुरू होणार आहे. अमरावती शहरातून आजपासून विदर्भात पहिला टप्पा सुरू करणार आहे. 

हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ही वस्तुस्थिती दाखविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने महापर्दाफाश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा अमरावतीपासून सुरू होणार असून, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या सर्व ठिकाणी ही यात्रा जाणार असून जनतेपर्यंत पोहचण्याचा यात्रेचा उद्देश असल्याचे आ. थोरात यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24