संगमनेर :- भाजपच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर जिल्ह्यात पुन्हा सुरू होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी मंडपाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. येत्या शुक्रवारी अकोले येथून दुपारी १२ वाजता यात्रेचे संगमनेरमध्ये आगमन होईल.
अकोले नाक्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून, जाणता राजा मैदानावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
वाॅटरप्रूफ मंडप उभारणीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी श्रीफळ वाढवून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘चला पुन्हा आणू आपले सरकार’ हा भव्य फलक व्यासपीठावर लावण्यात येणार आहे.
या सभेस भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
निळवंडे कालव्यांच्या कामाना युती सरकारने केलेली सुरुवात आणि मुख्यमंत्र्यानी कालव्यांच्या कामांना १२०० कोटी मंजूर केल्याबद्दल लाभक्षेत्रातील सुमारे १ लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे आभार पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.
शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीस मंजूर केलेले १६ कोटी, ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयास मंजूर केलेले अनुदान आणि प्रामुख्याने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवण्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय
आणि जिरायती भागाला पाणी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे, तसेच मागील पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात तालुक्यात मिळाल्याने महाजनादेश यात्रेचे महत्त्व वाढले आहे.
दरम्यान, या महाजनादेश यात्रेमध्ये कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करणार याकडेही लक्ष लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री काय बोलतात, निळवंड्याबद्दल कोणती घोषणा करतात, याकडेही राजकीय जाणकार लक्ष ठेवून आहेत.