धनगर समाजासाठी एक हजार कोटी :- महादेव जानकर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- राज्यातील धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजना येत्या ऑगस्ट पासून लागू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धनमंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ना. जानकर हे पारनेर तालुक्यातील टाकळीहाज़ी येथे आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. याबाबत अधिक माहिती देताना ना. जानकर यांनी सांगितले की, धनगर समाजाला लागू करण्यात येणाऱ्या योजनांबाबतची आढावा बैठक ओबीसीमंत्री संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

ना. जानकर या वेळी म्हणाले, अहिल्याबाई होळकर यांचे राज्यामध्ये ६५ ठिकाणी स्मारक होणार असून, यासाठी प्रत्येक स्मारकासाठी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक वाचनालय राहणार असून, अभ्यासासाठी लागणारीे पुस्तके, संगणक व इंटरनेटची व्यवस्था राहाणार आहे.

धनगर समाजासाठी सरकारने काय दिले, याची चर्चा सध्या होत आहे. मात्र, एक हजार कोटींचा निधी त्यातून समाजसुधारणेजोगी होणारी कामे महत्वपूर्ण असल्याने समाजासाठी सरकारने चांगले काम केले. ही सकारात्मक चर्चा यानंतर सुरू होईल.

देशात नरेंद्र व राज्यात देवेंद्र हे समीकरण विकासाच्या दृष्टीने चांगले जुळले असून, अल्पसंख्याक समाजासाठी विकासात्मक योजना राबवण्याबरोबरच सरकारने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचे आरक्षण पक्के केले असून, न्यायालयात आरक्षण टिकणार नाही, ही विरोधकांच्या चर्चेची टिंगलटवाळी झाली.

मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याने लवकरच त्यांच्या समाजातील युवकांना नोकऱ्या मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर टाकलेली जबाबदारी आपण यशस्वी पार पाडली आहे. हे सरकार सर्व समाज समावेशक असून, याचा प्रत्यय जनतेला आला असल्याची खात्री ना. जानकर यांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24