अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत – जामखेड मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट मिळणार नसल्याची शक्यता असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड व त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड भाजपच्या वाटेवर आहेत.
रोहित पवारांबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.प्रवेशाबाबत गुंड यांची पालकमंत्री राम शिंदे यांच्याबरोबर बैठक झाल्याचे समजते.
गुंड यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे. तिकीट न मिळाल्यास त्या भाजपमध्ये जाण्याची चिन्हं आहे.त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. तसे झाल्यास कुळधरण गटात भाजपची ताकद वाढेल.
कर्जत – जामखेड मतदारसंघात सहा महिन्यांपूर्वीच युवा नेते रोहित पवार यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगार मेळावे, शालेय साहित्य, विविध शिबिरांमुळे ते प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत पोचले आहेत.
दरम्यान याबाबत राजेंद्र गुंड म्हणाले, कि ज्येष्ठ नेते शरद पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ.भाजप प्रवेशाचे अजून ठरलेले नाही. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांचे मत जाणून घेऊ.
कर्जत-जामखेड तालुक्यात स्थानिक पातळीवर आम्ही काम केलं आहे. माझं कुटुंब गेली 40 वर्ष राजकारणात आहे. आम्ही तळमळीने पक्ष वाढवला. स्थानिक नेतृत्वाला विचारात घ्यायला हवं, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.’ असं मंजुषा गुंड यांनी याबाबत बोलताना सांगितले.