राम शिंदे व भाजपचे गुंड जिल्हयात अशांततेचे वातावरण तयार करत आहेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कर्जत – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कर्जत दौऱ्यावर येणार असल्याने युवक क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर त्यांचे लक्ष वेधून निषेध करण्याबाबतचे कर्जत पोलिस स्टेशनला निवेदन दिले.

त्यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली. दरम्यान निवेदनावर सही केलेल्या राशीन येथील किरण पोटफोडे या कार्यकर्त्याला गावगुंडांनी मारहाण केली.

या घटनेचा कॉंग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी पोलीस उपअधीक्षक संजय सातव तसेच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन दिले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी हे निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे की, युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह आप्पा अनारसे, किरण पोटफोडे, विनोद सोनवणे, सागर जाधव यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा निषेध करण्यासंदर्भातचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले.

भाजपाच्या गुंडांना याचा राग आला. युक्रांदचे राशीन शहराध्यक्ष किरण फोटफोडे यांना भाजपाच्या गुंडांनी जबर मारहाण करून त्यांचे घर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला.

या सर्व गुंडावर पोलिस प्रशासनाच्या वतीने कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी. पालकमंत्री राम शिंदे व भाजपचे गुंड जिल्हयात अशांततेचे वातावरण तयार करत आहेत त्याला आळा घालावा, अन्यथा या प्रश्‍नावर कॉंग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल.

आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, तालुकाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी हे निवेदन दिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24