कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे.
भाजप सरकार मध्ये मंत्री असूनही राज्यातील पूरग्रस्त भागात जाणे त्यांनी टाळले असून मतदार संघातच राहणे पसंत केले आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात कमी वेळ देणारे मंत्री शिंदे निवडणुका जवळ येताच मतदारसंघात रमायला लागले आहेत. जेव्हा त्यांची मतदारसंघात गरज होती तेव्हा मात्र ते मतदारसंघात नसायचे.
गेल्या आठ दिवसात त्यांची पूरग्रस्त भागात गरज आहे , ते काही एका मतदारसंघाचे मंत्री नाहीत तर राज्याचे मंत्री आहेत. पण ते पुरग्रस्तांचे अश्रू पुसायला न जाता कर्जत – जामखेड मध्येच थांबले आहेत.
त्याचवेळी कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले युवा नेते रोहित पवार मात्र सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पूर्वभागात फिरून लोकांना आधार देत आहेत.
राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर ते मतदारसंघात कमी आणि मुंबईत जास्त असं वातावरण निर्माण झालं होतं.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काही कालावधीतच त्यांचा अफाट जनसंपर्क तयार झाला आहे.
रोहित पवार सक्रिय झाल्यावर राम शिंदे यांनीही संपर्क वाढवला एवढा की त्यांच्या बदललेल्या जनसंपर्कांची लोक चर्चा करू लागलेच पण मंत्रालयातील अधिकारीही “साहेब मंत्रालयात कमी आणि मतदारसंघात जादा “अशी चर्चा करू लागले आहेत.
राज्याचे मंत्री असून ते सांगलीच्या पूरग्रस्त भागात फिरकलेले नाहीत, त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य असलेले रोहित पवार मात्र पाण्यात फिरत आहेत, लोकांचे अश्रू पुसत आहेत , त्यांना मदत करत आहेत.राम शिंदे मतदारसंघात तर रोहित पवार पूरग्रस्त भागात अशी परिस्थिती आहे.