श्रीगोंदे ;- बापूंनी आयुष्यभर पुण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर आणि कामांवर प्रेम करणारा समाज आज येथे उपस्थित आहे. बापूंचे कार्य आणि नाव सदैव तेवत राहील असे काम करूया, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले.
राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटील बोलत होते. बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना ‘नागवडे’चे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते म्हणाले, बापूंनी उभ्या केलेल्या सहकारी संस्था त्याच गतीने वाटचाल करत राहण्यासाठी त्या संस्थांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे हीच खरी आदरांजली ठरेल.
राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार म्हणाले, बापूंचे सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील काम अतुलनीय आहे. बापूंना जाऊन एक वर्ष झाले, तरी त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत. ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, बापूंच्या सहकारातील योगदानाचा राज्याला परिचय आहे.
बापूंचे समाजसेवेचे व्रत कुटुंबीयांनी अविरत सुरू ठेवणे हीच खरी आदरांजली ठरेल. मंगलदास बांदल म्हणाले, बापूंसारखी दर्शनस्वरूप माणसं गेल्याने समाजाचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. बापूंचा समाजकारणाचा वसा नागवडे कुटुंबीय अविरत चालवत असून तीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल.
आमदार राहुल जगताप म्हणाले, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ताकद देण्याचे काम केले. बापूंचे विचार आणि संस्कार बरोबर घेऊन काम करत राहू. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, बापू हे सर्जनशील राजकारणी होते.
सकारात्मक कामासाठी बापू सर्वांच्या पाठीशी उभे राहिले. बापूंनी निष्ठा ढळू दिली नाही. खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, बापूंचा आणि माझा संपर्क जास्त आला नाही. मात्र, बापू जेव्हा जेव्हा भेटले नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभले.