मुंबई :- धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 145 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.
राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्यांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली म्हणून चर्चा थांबली. आता चर्चा मुख्यमंत्रिपदावरच होईल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निकालानंतर महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही.
चर्चेबाबत शहांनी पुढाकार घेतला नाही. कारण त्यांनी ही जबाबदारी राज्यातील नेतृत्वाकडे दिली आहे. हरियाणाचा तिढा सुटला, मग महाराष्ट्राचा का सुटला नाही?’ असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं.