अकोले :- राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाने गुरूवारी घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीलाही त्यांनी दांडी मारली.
दरम्यान कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर लवकरच आ. पिचड यांच्याकडून याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
30 जुलैला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काल गुरुवारी आ. पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या या भेटी नंतर आ.पिचड यांच्या भाजप प्रवेशाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याचे कळते.आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी तसे संकेत दिले आहेत.
पक्ष बदला संदर्भात आ.पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती.आता याबाबत सर्वच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहे.कार्यकर्त्यांच्या संमती नंतरच भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.