महाराष्ट्रातील ह्या जिल्ह्याची डाळिंबे समुद्रमार्गे पोहोचली अमेरिकेला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : महाराष्ट्रातील सांगोला येथील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या डाळिंबांच्या ४ हजार २०० पेट्या कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) झेंड्याखाली समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झाल्या,

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी डाळिंबाच्या या प्रायोगिक तत्त्वावरील व्यावसायिक खेपेस हिरवा झेंडा दाखवला.

वाशीतील आयएफसी सुविधा, राज्य कृषी विपणन मंडळ येथील आयएनआय फार्म्सद्वारे ही १२.६ टनाची खेप पाठवण्यात आली. महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (एमएसएएमबी), प्रादेशिक वनस्पती विलगीकरण केंद्र, राज्य कृषी विभाग, एनआरसी डाळिंब, अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि आयएनआय फार्म्सचे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

अपेडाने गेल्या वर्षी तांत्रिक भागीदार म्हणून ‘आयसीएआर- एनआरसी डाळिंब’ यांच्या सहकार्याने किरणोत्सर्ग प्रक्रिया आणि स्थिर चाचणीसह डाळिंबाची हवाई खेप यशस्वीरीत्या पाठवली होती.

त्या प्रयोगानंतर, अपेडाने भारतीय डाळिंबाच्या संभाव्य बाजारपेठेसाठी सागरी व्यापार संबंधाच्या माध्यमातून डाळिंब पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अपेडाने २०२२-२३ मध्ये संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन आणि ओमानला ५८.३६ दशलक्ष अमेरीकी डॉलर्स किमतीच्या डाळिंबाची निर्यात केली आहे.

अपेडा नोंदणीकृत आयएनआय फार्म्सने या प्रायोगिक हवाई खेप, सागरी खेप आणि सागरी कंटेनरचे कार्यान्वयन केले आहे. ही कंपनी भारतातील फळे आणि भाज्यांचे सर्वोच्च निर्यातदार असून, त्यांची उत्पादने जगभरातील २५ हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत.

या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक बाजारपेठेतील कठोर मानकांची पूर्तता करण्यासाठी, डाळिंबाची गुणवत्ता आणि साठवण वाढवण्याकरता व्यापक प्रयत्न केले आहेत. एग्रोस्टार समूहाचा एक भाग म्हणून आयएनआय फार्म्सने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत थेट काम करून डाळिंबासाठी मूल्य साखळी स्थापन केली आहे.

भारतात सर्वाधिक उत्पादन

भारत जगातील सर्वात मोठ्या डाळिंब उत्पादकांपैकी एक आहे आणि आता जगातील डाळिंब निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे.

मऊ मांसल बिया, कमी आम्लता आणि आकर्षक रंगासह गुणवत्तेच्या दृष्टीने डाळिंबाच्या काही सर्वोत्तम जातींचे उत्पादन भारत करतो.

केशरी डाळिंब हे जगभरातील सर्वोत्तम जातीपैकी एक मानले जाते. गेल्या दशकात भारताने डाळिंबाचे क्षेत्रफळ तसेच उत्पादन वाढवले आहे आणि निर्यातीत वाढ झाली आहे. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही डाळिंब उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे.