अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहाता : डॉ. राजेंद्र पिपाडा व आमदार प्रशांत बंब या दोन्ही परिवारांनी लग्न करण्याची जी अनोखी पद्धत सुरू केली तिचे संपूर्ण देशाने अवलोकन करून, असे आदर्श विवाह सोहळे केल्यास देश बलवान बनेल, असे मनोगत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
पिपाडा परिवाराने अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा केल्याबद्दल डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी येवून ना. पटोले यांनी सत्कार केला. यावेळी आमदार लहू कानडे, बाबूशेठ पिपाडा, कचरदास बलदोटा, दिलीप वाघमारे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांची कन्या श्रृती व डॉ. राजेंद्र पिपाडा यांचे चिरंजीव निखिल यांचा आगळावेगळा विवाह सोहळा लासूर स्टेशन येथे झाला. डॉ. पिपाडा यांचे कुटुंबिय सकाळी मुलगी बघायला गेले व वधूलाच घरी घेवून आले.
अत्यंत साधेपणाने कुठलाही बडेजाव न करता अवास्तव खर्चाला फाटा देत एकाच दिवसात हा विवाह सोहळा पार पडला. वराच्या व वधूच्या आई-वडिलांचे नाव ऐकले तर असा साधेपणाने विवाह झाला, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.
या विवाह सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्न सोहळा चालू असताना भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश दिला.