दुधाला भाव नसल्याने उत्पादक अडचणीत

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : दुधाचे खरेदी दर कमालीचे घटले, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.

सध्या चारा टंचाई निर्माण झाली असताना दुधाचे दरही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असल्याने दुधउत्पादक शेतकऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आली आहे.

कोव्हिड प्रकोपानंतर मागील वर्षी प्रथमच दूध व्यवसायत उभारी आली आणि दुधाचे दर ३८ ते ४० रुपये झाले. परिणामी कोविडमध्ये उद्ध्वस्त झालेला शेतकरी व तरुण या व्यवसायात मोठया प्रमाणात उतरला आहे. लाखो रुपये किंमतीच्या संकरीत दुधाळ गायी व म्हशी खरेदी करून, आपल्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रयत्न करू लागला; पण हा आनंद चिरकाल न राहता त्यावर विरजण पडले.

अवघ्या काही महिन्यात दूधदर ढासळत राहिले ते आजपर्यंत. त्यावर शासनाने नेमलेल्या विविध समित्या फक्त कागदावरच राहिल्याने दूध उत्पादक मात्र दराअभावी देशोधडीला लागले आहेत.

त्यात गतवर्षी पावसाने दडी मारल्याने पशुधनाचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्हाळ्याच्या भीषण झळांचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होऊन उत्पादन घटल असताना दर कमी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनावरांच्या पोषण आहार (खुराक) यांच्या किंमतीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. दर महिन्याला पशुखाद्याच्या दरात वाढ होत असताना दुधाच्या दरात मात्र वाढ होताना दिसत नाही, त्यामुळे दूध व्यावसायिकांमध्ये सरकारबाबत असंतोष आहे.

दुग्ध व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात असून, सद्यस्थितीत दुधाला ३.५ व ८.५ फटला २५ रुपये दर मिळत आहे. हाच दर अगोदर २६ रुपये असताना पुन्हा ऐन उन्हाळ्यात त्यामध्ये १ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांना मागणी असूनही दर पडत असल्याने नेमकी या दुधाची मलई जाते कुठे? असा सवाल दुग्ध व्यावसायिकामधुन उपस्थित केला जात आहे.

पशुखाद्याला सोन्याचे मोल; परंतु वर्षभरात दुधाचे दर ३८ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, पशुखाद्यचे दर आजही १७०० ते १८०० रुपये असल्याने त्या दरात काहीच फरक नसुन दुध विक्री व्यवसायातून मजुरीचा खर्च सोडा पशुखाद्याचा खर्चसुध्दा निघत नाहीये. -अरुण गरड (दुग्ध उत्पादक, शेतकरी)

शासनाने दुधाला अनुदान जाहीर केले खरे; परंतु जाचक अटींमुळे कित्येक दुग्ध व्यावसायिक शेतकरी आजही अनुदानापासुन वंचित आहेत. दुधाला कमीत कमी ४० रूपये दर मिळावा. एक गाय महिन्याला सरासरी ९ हजार रुपयांचे दूध देते, खर्च मात्र १० हजार रुपये होतो परिणामी १००० तोट्यात दुध धंदा करावा लागत आहे. त्यामुळे अनेक उत्पादक दुग्ध व्यावसायापासून दुरावू लागले आहेत. -दत्तात्रय मोकळ (दुध उत्पादक शेतकरी (आव्हाणे बु.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe