अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे-शिर्डी खाजगी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचे प्रस्ताव रविवार दि.20 डिसेंबरला हुतात्मा स्मारकात मांडण्यात येणार आहे.
माजी खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते या प्रस्तावाचे पूजन करुन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सदर मागण्यांचे निवेदन ई मेलद्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच यावेळी साईबाबांचे मंदिर हे विश्व मानव मंदिर म्हणून गॅझेट प्रसिध्द केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शिर्डी येथील साईबाबा यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन माणुसकीचा धर्म आपल्या विचारातून समाजाला सांगितला. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर हे विश्व मानव मंदिर म्हणून सर्व समाजासमोर उभे आहे. सर्व धर्मिय भाविक येथे दर्शनास येत असतात. समाजामध्ये असलेली जाती-धर्माची तेढ संपवण्यासाठी साईबाबांचे विचार व शिकवण मार्गदर्शक आहे.
बाबांच्या शिकवणीत देशाचे अखंडत्व टिकून असून, सर्व धर्माचा सार त्यांच्या विचारात आहे. समाजात समता, बंधुता निर्माण होण्यासाठी साईबाबांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होणे आवश्यक असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे-शिर्डी खाजगी लोकल रेल्वे सुरु झाल्यास भाविकांची सोय होऊन त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्यास मदत होणार आहे.
तर विकासापासून वंचित राहिलेल्या नगर शहराला देखील व्यापाराच्या दृष्टीकोनातून एकप्रकारे चालना मिळणार आहे. बुलेट ट्रेनपेक्षा ही रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची व प्रभावशाली ठरणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
या मागणीसाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी आग्रही आहेत.