हाथरसच्या घटनेचा निषेध नोंदवून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातून कँडल मार्चसह संविधान रॅली काढण्यात आली.

धर्मांध सरकारमुळे देशात मुलगी व संविधान धोक्यात असल्याचा आरोप करीत हिटलशाही भाजप हटाव लोकशाही बचावच्या घोषणा देण्यात आल्या. तर हाथरस येथील घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कँडल मार्च व संविधान रॅलीचे प्रारंभ करण्यात आले. यामध्ये आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, नईम शेख, संतोष पाडळे, सुशील म्हस्के, विनीत पाडळे, राकेश चक्रनारायण, भिम वाघचौरे, दिनेश पाडळे, आकाश काळे, आकाश पाडळे,

अमित गायकवाड, सोनू काळे, आकाश भालेराव, कार्तिक म्हस्के, सोनू गायकवाड, विनोद पाडळे, वैभव भालेराव, हर्षद पेंढारकर, उमेश गायकवाड, विकी प्रभळकर, सचिन बाबनी, सोनू भंडारी, जयेश काळे, जावेद शेख आदि सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पिडीत तरुणीची प्रतिमा घेऊन नगर-पुणे महामार्गावरुन निघालेल्या या रॅलीत मोदी प्रणित भाजप सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या रॅलीचा समारोप मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झाला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन पिडीत तरुणीला श्रध्दांजली वाहण्यात आली. सुशांत म्हस्के म्हणाले की, मोदी प्रणित भाजप सरकार देशात सत्तेवर आल्यापासून दलित व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. देशात अंधाधुंदी कारभार चालू असून, धर्मांध शक्तीची शिरकाव झाला आहे.

भाजप सरकार संविधानाच्या विरोधात हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत असून, जातीयवादामुळे सर्वसामान्य भारतीय जनता होरपळत आहे. शेतकरी, कामगार, दलित व अल्पसंख्यांकाना गुलाम बनविण्याचे हे षडयंत्र असून, सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले.

दानिश शेख यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने पोलीसांना पुढे केले. दलित युवतीवर अत्याचार होऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही. उलट उत्तरप्रदेश पोलीस मुलीचा मृतदेह रात्रीतून जाळून टाकण्यात आला.

पिडीत मुलीच्या कुटुंबीयांवर दडपण आनले जात आहे. या घटनेच्या काही दिवसातच बलरामपूर येथे दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. उत्तरप्रदेशात कायदा सुव्यवस्था नसल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे सांगून, योगी सरकार बडतर्फ करण्याची मागणी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24