महाराष्ट्र

बदलापूर अत्याचाराविरोधात जनप्रक्षोभ ! १० तास रेल्वे रोको, लाठीमार अन दगडफेक, मंत्री गिरीश महाजनांसह आमदारही घेरले

Published by
Ahmednagarlive24 Office

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका शाळेत तीन आणि चार वर्षाच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी दाखवलेली दिरंगाई, तसेच शाळा व्यवस्थापनाने हा प्रकार दडपण्याचा प्रकार केल्याने शहरभर आणखीच संतापाची लाट पसरली.

या घटनांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी बदलापुर बंदची हाक देण्यात आली. शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, शाळा, रिक्षा बंद ठेवण्यात आल्या असतानाच पालकांनी सकाळी शाळेसमोर ठिल्या आंदोलन केले.

त्यानंतर त्यांचा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकावर निघाला आणि तब्बल १० तास रेल्वे रोको आंदोलन केले. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले.

अॅड. उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याचा निर्णयदेखील सरकारकडून जाहीर केला. दरम्यान, सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी बदलापुरात धाव घेत आंदोलनकत्यांशी संवाद साधला.

मात्र स्थानिक आमदार तसेच मंत्र्यांना देखील आंदोलनकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. परिणामी पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवत सायंकाळी रेल्वे सेवा पूर्ववत केली.

लाठीमार आणि दगडफेक
रेल्वे रुळावर संतप्त आंदोलक आंदोलन करत होते.अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आंदोलकांची तीन तास समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत तर नव्हतेच शिवाय त्यांच्या रोषालाच अनेक नेत्यांना व पोलीस अधिकाऱ्याना सामोरेजावे लागले. अखेर पोलिसांनी कुमक मागवत रेल्वे रुळावरील आंदोलकांवर

सौम्य लाठीमार केल्याने वातावरण चिघळले व आंदोलकांकडून पोलिसांवरच दगडफेक करण्यात आल्याचीमाहिती समजली आहे.

फडणवीसांची एसआयटी नेमण्याची घोषणा
बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office