Maharashtra News : मराठा समाज आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शहरात रविवारी संवाद यात्रा येत असून त्यानिमित्त वीरभद्र मंदिर प्रांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेस मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राहता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेचे आयोजन व नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नितीन पटारे, ताराचंद कोते, अनिल बोठे, चंद्रशेखर कार्ले, दशरथ गव्हाणे, सुहास निर्मळ, सागर बोठे, वीरेश बोठे, पंकज शिंदे, अक्षय सदाफळ आदी उपस्थित होते.
नितीन पटारे म्हणाले, की सरकार आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन समाजात फूट पाडत आहे. मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करून मराठा आरक्षण प्रश्न दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सरकार विषयांतर करीत असल्याचा आरोपही पटारे यांनी केला.
याप्रसंगी ताराचंद कोते यांनी जरांगे पाटील यांच्या स्वागताची माहिती देताना सांगितले, की जरांगे पाटील यांचे राहत्यात आगमन झाल्यानंतर राहाता बसस्थानक ते वीरभद्र महाराज प्रांगणापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात साध्या पद्धतीने नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाने मिरवणूक काढली जाणार आहे.
राहाता येथील समाजबांधवांना संबोधित केल्यानंतर जरांगे पाटील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा शिर्डीकरांच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य भाविकांप्रमाणे साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात कार्यकर्त्यांसमवेत जात जरांगे पाटील रांगेतून भोजन महाप्रसाद घेणार असल्याची माहिती कोते यांनी दिली.
अनिल बोठे यांनी सांगितले, की सभेदरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून राहता शहरातील वाहतूक मायंबा मंदिराच्या लगतच्या बाह्यवळण रस्त्याने वळवावी अशी विनंती पोलिसांना केली आहे. सभेसाठी महिला व पुरुष मिळून सुमारे ४०० स्वयंसेवक ठेवले आहेत.
सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये, म्हणून राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर, सेंट जॉन स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा तसेच शनी मंदिर चौकालगत वाहन तळाची व्यवस्था केली आहे. दशरथ गव्हाणे यांनी सभेत उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी तसेच महिला भगिनींनी स्कार्फ आणावा तसेच सोबत पाण्याची बाटलीसुद्धा ठेवावी, असे आवाहन केले. सचिन चौगुले यांनी सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह सभेस यावे, असे आवाहन केले.