Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबई प्रमाणेच वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांची हीच अडचण दूर करण्यासाठी आता शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे नियोजन आहे.
या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लीनिक या मार्गावर सध्या मेट्रो सुरू आहे. हे मेट्रो मार्ग ऑगस्ट 2023 मध्ये पुणेकरांसाठी सुरू करण्यात आले आहेत. या मार्गांचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
विशेष म्हणजे मेट्रो सुरु झाल्यापासून पुणेकरांचा प्रवास गतिमान झाला आहे. यामुळे मेट्रोला शहरातील नागरिकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. दररोज पुणे मेट्रो ने जवळपास 60 ते 65 हजार प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान याच पुणे मेट्रोबाबत मेट्रो प्रशासनाने एका अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट खरेदी केल्यानंतर 90 मिनिटांच्या आत आपला प्रवास पूर्ण करावा लागणार आहे. जर प्रवाशांनी त्यांचा प्रवास 90 मिनिटांच्या आत पूर्ण केला नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार असे पुणे मेट्रोने स्पष्ट केले आहे. म्हणजे आता प्रवाशांना तिकीट खरेदी केल्यानंतर त्यांना ज्या स्थानकावर जायचे आहे तेथून 90 मिनिटांच्या आत बाहेर पडणे अपेक्षित आहे.
जें प्रवाशी असे करण्यास असमर्थ ठरतील त्यांच्याकडून दर तासाला दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय मेट्रोने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आता 85 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर, मेट्रो स्थानकात तिकीट स्कॅन करूनच प्रवेश दिला जातो आणि मेट्रो स्थानकातून बाहेर पडण्यासाठी देखील तिकीट स्कॅन करावे लागते.
मात्र ज्या स्थानकावर तिकीट काढले आहे त्या स्थानकांपासून ते ज्या स्थानकापर्यंत प्रवास करायचा आहे त्या स्थानकापर्यंत स्थानकाबाहेर न पडता कितीही वेळा प्रवास करता येतो. यावर उपाययोजना म्हणून विना तिकीट प्रवास करताना कोणी आढळलं तर 85 रुपये एवढा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.