पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आता साईनगरी शिर्डीतून जाणार ! कसा असेल रूट ? पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune-Nashik Railway : मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे राज्याचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखली जातात. मात्र मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकचा विकास काहीसा मंदावलेला असल्याचे पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतरही नाशिक ते पुणे असा प्रवास करण्यासाठी रेल्वे मार्ग तयार झालेला नाही. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

यामुळे पुणे आणि नाशिक शहरातील नागरिकांच्या माध्यमातून या दोन्ही शहरात दरम्यान रेल्वे मार्ग विकसित झाला पाहिजे अशी मागणी केली जात होती. दरम्यान नाशिक ते पुणे दरम्यान नवीन हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे.

यामुळे नाशिक आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना उभारी मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरे तर हा प्रकल्प महारेलने हाती घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचा अहवाल तयार झाला असून याला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता देखील दिलेली आहे.

या प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांमध्ये भूसंपादनाची कारवाई देखील सुरू झाली आहे. भूसंपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकाऱ्यांनी भूसंपादनासाठी जमिनीची मोजणी करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि बाधित होणारी जमीन थेट खरेदीने ताब्यात घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी बाराशे ते पंधराशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

दुसरीकडे या प्रकल्पाला निधी देण्याऐवजी रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प स्वतःकडे ओढून घेतला. विशेष म्हणजे याचा DPR सुद्धा बदलण्याचा निर्णय घेतला. यामुळे या प्रकल्पासाठी हळूहळू संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही याचे काम थांबले आहे. या दोन्ही संस्थेच्या वादामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळणार की काय अशी भीती नागरिकांना भेडसावू लागली आहे.

अशातच आता या प्रकल्पामध्ये आणखी एक मोठी डेव्हलपमेंट झाली आहे. खरे तर हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. तथापि हा प्रकल्प मंजुरीमुळे सरकारच्या फायलीतच ठाण मांडून बसला आहे.

आता मात्र हा प्रकल्प फाईल मधून बाहेर येईल आणि रस्त्यावर देखील याची काहीतरी डेव्हलपमेंट पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. कारण की, या रेल्वे मार्गाच्या रूटमध्ये आता बदल करण्यात आला आहे. आता हा रेल्वे मार्ग शिर्डीमधून जाणार आहे. यामुळे या रेल्वे मार्गाचे अंतर 30 किलोमीटरने वाढणार असा अंदाज आहे.

यानुसार हा मार्ग राजगुरुनगर ते संगमनेर या टप्प्यात बदलला गेला आहे. या रेल्वे मार्गात आता बदल झाला असल्याने हा रेल्वे मार्ग सुधारणेसह रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे आता या सुधारित पुणे-शिर्डी-नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.