सातफेरे घेण्यापूर्वीच नवरदेवावर काळाचा घाला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-लग्नघटिका समीप आलेली…शेवटची मंगलाष्टक सुरू होते, आता सावधान म्हणाल्यानंतर नवरदेव भावी पत्नीला पुष्पहार घालून साता जन्माची गाठ बांधणार तोच नवरदेव अचानक कोसळला.

क्षणात मंडपात स्मशानशांतता पसरली. नवरदेवाला तसेच खासगी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे उपचार सुरु करण्याआधीच निधन झाले.

कर्जत तालुक्यातील विवाह समारंभात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. याबाबत अधिक माहिती अशी कि,

कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील मुलीचा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील पंचवीस वर्षांच्या युवकाबरोबर विवाह ठरला होता. रविवारी ठरल्या दिवशी सर्व धार्मिक विधी सकाळी पार पडले.

हळदी आणि इतर रंग उधळले गेले. डीजे तालावर नवरदेवासह मित्रमंडळीही नाचली. दुपारी शुभविवाह सुरू झाला. वधू आणि वरांचे मामा पाठीमागे पुष्पहार आणि गुच्छ घेऊन उभे होते.

मान्यवरांनी आशीर्वाद देऊन झाले. शेवटची मंगलाष्टकातील आता सावधान समयो…असे बोल म्हटले जात होते. तेवढ्यात वराच्या छातीत कळ निघाली तो खाली कोसळला. मांडवात एकच धांदल उडाली.

तातडीने त्याला गाडीत घालून उपाचारासाठी नेले. परंतु काही वेळाने त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सारे होत्याचे नव्हते झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली.

अहमदनगर लाईव्ह 24