अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांमुळे पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. आज भाजपाची राज्यस्तरीय बैठक झाली यामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर व्यथा मांडल्या.
मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली यात अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेतला गेला.
यानंतर राम शिंदे म्हणाले दोन्ही बाजू ऐकुण घेतलेल्या आहेत, यानंतर कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याअगोदर जी काही कार्यवाही करायची आहे,
त्यासाठीचा वस्तूनिष्ठ अहवाल संघटनमंत्री पुराणीक हे प्राप्त करून घेणार आहेत. त्यावरून प्रदेश यासंदर्भात कार्यवाही करणार आहे. यामुळे प्रदेश नेतृत्वाकडून देण्यात आलेल्या निर्देशावर आमचं समाधान झालं आहे.
तसेच, जिल्हापरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उद्या संध्याकाळी कोअर कमिटीची अहमदनगरमध्ये बैठक होणार आहे.
राधाकृष्ण विखे पाटील व माझ्यावर विशेषकरून यासंदर्भातली जबाबदारी प्रदेश नेतृत्वाकडून सोपवण्यात आली असल्याचेही राम शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडीला रोखण्यासाठी दोघांनी एकत्र येणे हिताचे असल्याचे सांगितले गेले. यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या नगर जिल्ह्यात बैठक होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.