अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील ‘यूटर्न’ घेऊन पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.
नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त एका दैनिकानं दिलं आहे. त्यानंतर विखे पाटील माघारी फिरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
मात्र या चर्चांना स्वत: राधाकृष्ण विखे पाटलांनी पूर्ण विराम दिला आहे. मी भाजपमध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी केली.
काँग्रेसची भूमिका मी प्रभावीपणे राबवली होती. काही अडचणींमुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. आता मी भाजपचा कार्यकर्ता आहे.
मात्र भाजप सोडण्याच्या ज्या चर्चा होत आहेत त्या दुर्दैवी आहेत. मी भाजपमध्येच राहणार आहे. माझी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट सुद्धा झालेली नाही, त्यामुळे अशा चर्चांमध्ये तथ्य नाही.
माझी बदनामी करण्यासाठी अशा बातम्या येत आहेत. अशा चुकीच्या बातम्या पसरवण्याऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या मागे कायम उभे राहणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार नसून भाजप कधीही सोडणार नसल्याची ठाम भूमिका विखे पाटील यांनी मांडली आहे.