विखे पाटील म्हणाले, आम्ही फार काळ विरोधी बाकांवर बसणार नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव:  भाजपाच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीसाठी जळगावमध्ये आलेले माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनतेचा कौल आमच्या बाजूनेच आहे.

त्यामुळे फार काळ विरोधात बसावे लागणार नसल्याचे सांगून राज्यात पुन्हा एकदा सत्तापालटाचे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत अर्धा वाटा या प्रमुख दोन मुद्यांवरून शिवसेना या पक्षाने भाजपाशी असलेली युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला.

महाविकास आघाडीत सहभागी होत सत्ताही स्थापन केली. पण हे सरकार फार दिवस टिकणार नसल्याचे संकेत विरोधी पक्षांचे नेते देत आहेत. भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील शनिवारी, भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठकीसाठी जळगाव शहरात आले होते.

यावेळी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, जनतेचा कौल आमच्या बाजूनेच आहे. त्यामुळे फार काळ विरोधात बसावे लागणार नाही. फक्त वाट पहा, असे सांगून त्यांनी पुढे काय घडते याविषयीची उत्सुकता वाढविली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विविध कामांना सध्या स्थगिती देण्यात येत आहे. त्याविषयी विखे-पाटील म्हणाले की, आताच्या सरकामधील लोक भाजपच्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा ही कामे अयोग्य नव्हती का? आताच कशी अयोग्य वाटताहेत? असा प्रश्‍नही आ. विखे पाटील यांनी उपस्थित केला.

अहमदनगर लाईव्ह 24