अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडू शकतो, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
दरम्यान कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी 1 नोव्हेंबरपासून पावसाची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत तीन ते चार दिवस,
तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी 2 नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत
तर काही जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरवातही झाली आहे. मात्र, पेरणी होताच पाऊस झाला तर पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. आता कुठे पावसाने उघडीप दिल्याने रब्बी हंगामातील कामे सुरळीत सुरु होती.
अधिकचा पाऊस झालेल्या क्षेत्रामध्ये अद्यापही वाफसे नाहीत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच नोव्हेंबर महिन्यातील 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू येथे पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.