नगर :- शहर व उपनगरात रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दीड ते दोन तास झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यांची पुन्हा दाणादाण उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित नगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेचे काही रस्त्यांचे पॅचिंग करण्यात आले होते. त्या काही रस्त्यांवरील डांबर पावसाने वाहून गेले.
या पावसामुळे शहरांतर्गत रस्त्यावर चिकचिक वाढली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नगर शहर व उपनगरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. या पावसाने रस्ते धुवून गेले, काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात घाण साचली होती.
गेल्या काही महिन्यांमध्ये पाइपलाइन टाकणे, ड्रेनेजची दुरुस्ती, अशा विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले होते. त्यानंतर अनेक रस्त्याची व्यवस्थित दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे रविवारी झालेल्या पावसानंतर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चिकचिक झाली आहे.
अशा रस्त्यावरून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने अनेक वाहनचालक संथगतीने गाडी चालवत होते. यापैकी बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरले होते. वाहन चालवताना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
पावसामुळे नालेगाव परिसरातील गाडगीळ पटांगणातील भाजी मार्केटचा परिसर चिखलमय झाला. त्यामुळे येथे भाजी विक्रेत्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे हाल झाले. याशिवाय चितळे रोड, लक्ष्मी कारंजा चौक, अशा विविध भागात रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांनाही त्रास सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वीच नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपले होते.