अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर गुरुवारी राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांनी दिलेला सल्ला आज अंमलात आणला.
राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याचे शुक्रवारी समोर आले. खुद्द शरद पवार यांनीच प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली. ‘राज यांचा फोन आला होता.
राज्यपालांनी आपल्याशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याशी भेटण्याबाबत काहीही ठरलेले नाही, कारण मी चार दिवस बाहेरगावी चाललो आहे,’ असे पवार यांनी सांगितले.
वाढीव वीज बिल व दूध दराच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. टाळेबंदीत अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांकडे पैसे नाहीत.
अशा परिस्थितीत ज्यांना दोन हजार बिल यायचे त्यांना १० हजार बिल आले. वीज कंपन्यांनी यावर तोडगा काढावा. राज्य सरकारने त्यासाठी प्रयत्न करावा व राज्यपालांनी या संदर्भात सरकारला सूचना कराव्यात,
अशी मागणी राज यांनी कोश्यारींकडे मांडली होती. तसे निवेदनही त्यांनी राज्यापाल यांना दिले हाेते. त्यावर, ‘तुम्ही शरद पवार यांच्याशी बोला,’ असा सल्ला कोश्यारींनी राज यांना दिला होता. त्यानुसार, राज यांनी शरद पवारांना आज फोन केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved