Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच जाहीरपणे खरमरीत भाषेत पत्र लिहिले आहे.
त्यांनी म्हटलं आहे, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!
राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र जशाच तसं :
तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी! गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे
ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत,
जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!